गुरुवार, २६ जानेवारी, २०१२

मुलांना पोषक आहार मिळावा म्हणून काय भूमिका घेतात? महाराष्ट्रातल्या दोन आघाडीच्या प्रयोगशील शाळांच्या प्रयत्नांविषयी..

सौजन्य - लोकमत सखी २६ जानेवारी १२
 
दिल्ली उच्च न्यायालयानं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अधिपत्याखालील अन्न सुरक्षा आणि प्रमाणीकरण प्राधिकरणाला मुलांच्या आहाराविषयी निर्देश दिले आहेत. त्यांना सहा महिन्यांचा कालावधी देऊन विद्यार्थ्यांना मिळणार्‍या पोषक आहाराविषयी स्पष्ट निकष तयार करण्यास सांगितले आहे. या पार्श्‍वभूमीवर आपल्याकडील शाळा पोषक आहाराविषयी काय विचार करतात? मुलांना पोषक आहार मिळावा म्हणून काय भूमिका घेतात? महाराष्ट्रातल्या दोन आघाडीच्या प्रयोगशील शाळांच्या प्रयत्नांविषयी..

नाचणीचे नूडल्स, बाजरीचा पास्ता
एकदा मी आणि माझी मैत्रीण नीलिमा बोलत होतो. नीलिमा ही आयुर्वेदिक डॉक्टर असून, बालरोग तज्ज्ञ म्हणून काम करते. ती मला तिच्याकडे येणार्‍या मुलांच्या तक्रारीविषयी सांगत होती. तिच्याकडे मंदार हा इयत्ता सहावीत शिकणारा विद्यार्थी आला होता. त्याला काही महिन्यांपासून पोटदुखीचा त्रास होत होता. तपासणीनंतर असं लक्षात आलं की, त्याच्या आहारात मेदयुक्त पदार्थ खूप असतात. त्याच्याशी, त्याच्या पालकांशी बोलल्यानंतर समजलं की त्याला पाव, केक, बिस्किटं, पिझ्झा हे पदार्थ खूप आवडतात. तो इतर पदार्थ खातच नाही म्हणून आई-वडीलही त्याला ते आवडीनं देतात.
नीलिमाकडे आलेली आणखी एक बालरुग्ण तन्वी. नऊ वर्षाची ही मुलगी जरा खेळली की दमायची, खाण्या-पिण्याच्या तर आत्यंतिक खोड्या. परंतु नूडल्सचं नाव काढताक्षणी तिची भूक तयार. मग काय तिला आवडतं म्हणून घरी मोठय़ांना पोळी-भाजी आणि हिला आपल्या नुडल्स. या नुसत्या नूडल्सने काय पोषण होणार होतं तिचं. तिची तपासणी केल्यावर समजलं की तिचं हिमोग्लोबिन खूप कमी आहे. मंदार, तन्वी दोघंही चांगल्या घरातली मुलं. पण या मुलांच्या समस्या मात्र आहाराशी निगडित होत्या. हट्टी मुलं आणि हतबल पालक अशा स्थितीत मुलांच्या आरोग्याचा बळी जातो एवढं मात्र खरं. नीलिमाचं बोलणं ऐकल्यावर मला एका गोष्टीचं हायसं वाटलं की, आमच्या आनंद निकेतन शाळेमधील मुलांचे पालक मात्र मुलांच्या आहाराबाबत खूपच जागरूक झाले आहेत.
मुलांच्या जेवणाची एक वेळ शाळेत जाते. या वेळेत मुलं नेमकं काय खातात यावर पूर्ण दिवसाची त्यांची ऊर्जा अवलंबून असते. म्हणून आमच्या शाळेनं मुलांच्या या डब्यात काय दडलेलं असतं याचं निरीक्षण करायचं ठरवलं. खरंतर प्रत्येक शाळेनं मुलांच्या डब्याबाबत चिकित्सक आणि आग्रही असलंच पाहिजे. काही शाळा या मध्यान्ह आहाराचे पैसे मुलांच्या फी सोबत घेतात. या मध्यान्ह आहाराच्या पुरवठय़ासाठी कोणत्या तरी कँटीनला कंत्राट दिलं जातं. तर मराठी माध्यमाच्या महानगरपालिका, जिल्हा परिषदा आणि खासगी अनुदानित शाळांमध्ये खिचडी वाटप केलं जातं. पण एवढय़ावर शाळेनं थांबावं का? तर नाही कारण मुलांच्या आहाराबाबतची ही केवळ व्यवस्था आहे. या व्यवस्थेद्वारे मुलांच्या पोटापर्यंत काय पोहोचतं, कसं पोहोचतं हे बघणंही महत्त्वाचं आहे. आनंद निकेतन ही आमची शाळा मुलांना शाळेत पोषक आहार पुरवत नाही. मात्र, ते खात असलेला डबा त्यांचं पोषण करणारा आहे ना, हे मात्र आम्ही आवर्जून बघतो.
एकतर डब्यावरून मुलांमध्ये भेदाभेद नको म्हणून शाळांनी हल्ली पोळी-भाजीचा डबा सक्तीचा केला आहे. पण बालवाडीची मुलं सकाळी नऊ वाजता शाळेत येतात. कधी कधी तर त्यांचा नाष्टाही झालेला नसतो. शाळेच्या मधल्या सुट्टीत ते आईनं दिलेला पोळी-भाजीचा डबा खातात. बारा वाजता शाळा सुटल्यावर घरी जातात. आई परत त्यांना पोळी-भाजी खाण्याचा आग्रह करते. पण सारखी पोळी-भाजी खाऊन मुलं वैतागतात. अशावेळी आम्ही डब्याला भलेही पोळी भाजी नसू देत; पण थालीपीठ, पराठे, घावन, धपाटे असे पदार्थ आणण्याची परवानगी देतो.
आता आमच्या विद्यार्थ्यांचे डबे एकसुरी नसतात. तर त्यात वैविध्य असतं आणि पोषक घटकही असतात. विद्यार्थ्यांच्या आयांसमोर असे अनेक चांगले पर्याय आता उपलब्ध आहेत जे त्यांच्याच कल्पनाशक्तीतून अवतरले आहे. आम्ही पालक सभांमधून पोषक आहाराविषयीच्या चर्चेला सुरुवात करून दिली. मदतीला आहारतज्ज्ञ घेतले. ज्यांच्या मार्गदर्शनामुळे पालकांचे उद्बोधन झालं. मग आमच्या शाळेनं तीन वर्षांपूर्वी पहिल्यांदा ‘पौष्टिक डबा’ ही अनोखी स्पर्धा मुलांच्या माध्यमातून खास पालकांसाठी आयोजित केली. पाचवी ते सातवीचे पालक यात सहभागी होतात. १५ दिवसांच्या पूर्वघोषित कालावधीत शाळा विद्यार्थ्यांंच्या डब्यातील पदार्थ, त्यातील घटकद्रव्य, त्या पदार्थाचं पोषणमूल्य याची नोंद ठेवते. आणि या नोंदीवरूनच मग स्पर्धेचा निकाल ठरतो. पण या स्पर्धेमुळे पालक मुलांच्या आहाराबाबत सजग झालेत, मुलांना देण्यात येणार्‍या पदार्थांच्या बाबतीत चिकित्सक झाले आहेत. या स्पर्धेतून नाचणीच्या नूडल्स, बाजरीचा पास्ता, गाजराचा केक, मिश्र डाळींचे धपाटे असे अनेक नावीन्यपूर्ण पदार्थ मुलांच्या डब्यात पाहायला मिळाले. आता तर या स्पर्धेसाठी आमचे विद्यार्थीच खूप उत्सुक असतात. कारण त्यांना यामुळं नवीन खाऊ मिळणार असतो ना!
प्रयत्न,संवाद प्रबोधन, प्रयोग यामुळे कृती होतात, वृत्ती बदलतात. बाजाराला डावलून नवीन चांगले पर्याय आपल्यातूनच पुढे येतात. मुलांच्या डब्याला रोज नवीन काय? हा बहुतेक आयांना छळणारा प्रश्न, वाटतो तितका अवघड नाही, हे आमच्या शाळेतील प्रयोगानं दाखवून दिलं आहे. आमच्या या प्रयोगानं पालकांमध्ये आत्मविश्‍वास आला आहे. आपल्या विद्यार्थ्यांंच्या आरोग्याला प्राधान्यक्रम देऊन यासारखे प्रयोग सर्व शाळांमध्ये होऊ शकतात. गरज आहे ती सर्व शाळांनी ‘मुलांचा आहार’ हा विषय आपला मानण्याची !
- शोभना भिडे
शिक्षिका- आनंद निकेतन, नाशिक

पोळी-भाजीबरोबर कोशिंबीरपण !
मुलं शाळेत घालवत असलेला वेळ खूप जास्त असतो. शाळेतून मुलं घरी आल्यावरही ती ताजीतवानी असावीत, मैदानी खेळ खेळण्यास उत्सुक आणि खेळल्यानंतरही उत्साही असावीत ही पालक आणि शिक्षक या दोघांचीही अपेक्षा असते. मुलांचं विशिष्ट काळानंतर कंटाळणं, दमणं, मरगळणं स्वाभाविक असतं. हे सर्व त्यांच्याबाबतीत होत असेल तर ती निरोगीच असतात. मात्र, मुलांचं सतत अस्वस्थ असणं, निरुत्साही असणं हे त्यांचं काहीतरी बिनसल्याचं लक्षण असतं. त्यांच्या या समस्येकडे केवळ वर्तन समस्या म्हणून बघणं म्हणजे समस्येची एकच बाजू बघण्यासारखं होतं. आपण शिक्षक किंवा पालक म्हणून मुलं आणि ऊर्जा यांचा सहसंबंध जसा अपेक्षित धरतो, तसंच त्यासाठी आवश्यक असलेला ‘मुलं आणि खाणं’ या सहसंबंधाला कमी महत्त्व का देतो?
आमच्या शाळेत आम्ही मुलांना पोषण आहार देत नसलो, तरी आम्ही पोषक आहाराबाबत मात्र आग्रही असतो. शाळेमध्ये मुलं विज्ञानात संतुलित आहाराविषयी शिकतात. आम्ही हा संतुलित आहाराचा विषय केवळ धड्यापुरता र्मयादित ठेवलेला नाही. आम्ही त्याला आमच्या शाळेत नियमाचं स्वरूप दिलं आहे. हा नियम जरी सक्तीचा असला, तरी तो मुलांसाठी आनंददायक आणि पालकांसाठी दिलासादायक ठरतो आहे. आठवड्याच्या सातही दिवसांत मुलं जे खातात ते पोषकच असलं पाहिजे, याबाबत आम्ही आग्रही असतो. यासाठी आम्ही विद्यार्थ्यांंनी डब्याला रोज पोळी-भाजी आणि सॅलड किंवा कोशिंबीर आणावी, असा नियम केला आहे. या नियमात सूट म्हणून आठवड्यातले दोन दिवस मुलं डब्याला खाऊ आणू शकतात. पण हा खाऊ इडली, पराठे या स्वरूपाचा पण पौष्टिक असावा. शिवाय त्याच्यासोबत सॅलड किंवा कडधान्याची कोशिंबीर असावी, असा आग्रह धरतो. आम्ही मुलांच्या आहारात कच्च्या भाज्यांचा आग्रह धरतो. चौथीपर्यंंत आम्ही जातीनं मुलांच्या डब्याचे निरीक्षण करतो. जिथं आम्हाला खटकतं ते पालकांपर्यंंत पोहोचवतो. आमचं अस निरीक्षण आहे की, विद्यार्थी ते आणतात, शाळेने बनवलेले नियम पालकही ओझं म्हणून नव्हे, तर मुलांच्या फायद्यासाठी आनंदानं पाळतात. तशा भावना आमच्या पालकसभेत ते स्वत: व्यक्त करतात. निम्न आर्थिक स्तरातील काही विद्यार्थी पोषक आहाराबाबतचा शाळेचा नियम पाळू शकत नाही. त्या मुलांच्या बाबतीत आम्ही सर्व शिक्षक अशा मुलांसाठी दरवर्षी एक ठराविक वर्गणी आमच्यातूनच गोळा करतो. आणि पोषक घटक असलेला खाऊ आणून तो या मुलांना देतो.
कोणतीही गोष्ट सक्तीतून कृतीत जरी येत असली तरी ती साध्य होईलच असं नाही. म्हणूनच आम्ही सक्तीसोबत संवादाचेही सूत्र पाळतो. विद्यार्थ्यांंबरोबर, त्यांच्या पालकांबरोबर या विषयावर संवाद साधतो. नुसता पोळी-भाजीचा डबा हा नियम शाळेच्या दडपणाखाली विद्यार्थी-पालक पाळतीलही; पण रोज तेच तेच म्हणून कंटाळतीलही ना! पालकांना या विषयात निवडीला वाव मिळावा, त्यांच्या पर्यायात वैविध्यता यावी आणि शाळेने बनवलेल्या या नियमात त्यांचा मनापासून सहभाग मिळावा यासाठी आम्ही पालकसभा घेतो. पालकांना त्यांच्या समस्येवर चर्चा करता यावी, काही उत्तरं मिळावीत म्हणून अशा पालकसभेत आम्ही आहारतज्ज्ञ, आयुर्वेदिक डॅाक्टर यांना बोलावलं. सर्व पालकांचे प्रश्न मुलांच्या आहाराबाबत काळजी व्यक्त करणारे; पण काही न सुचणारे, मुलांच्या हट्टापुढे काहीही पर्याय न ठेवता झुकणारे असे होते. आम्ही पालकसभांमधून या पालकांना हेच समजावून दिलं की, शाळेत जाणार्‍या बहुसंख्य मुलांच्या वर्तन समस्या या आहाराशी निगडित आहे. मुलांचं नीट पोट भरलेलं असलं तरच ते स्थिर राहतील, अभ्यासात लक्ष केंद्रित करू शकतील, खेळात सहभागी होऊ शकतील. समस्या बनलेली मुलांची दंगा, मस्ती, त्यांची अस्वस्थता, अतिचंचलता यामागे इतरही कारणं असतील; पण त्या इतर कारणांमध्ये आहार हे एक कारण निश्‍चितपणे असतं. आणि या कारणावरचा उपाय/पर्याय पालकांकडेच असतो. मग तो का वापरू नये. आम्ही पालकसभांमध्ये याच कृतीवर भर देतो. सक्तीने काय काय टाळायचं आणि कृतीतून चांगलं काय पाळायचं याची दिशा आम्ही शिक्षक आणि पालकांनी ठरवली. ती आज शिस्त, नियम या नावानं जरी ओळखली जात असली तरी आम्ही आनंदी आहोत. कारण पोषक आहाराचा हा नियम, ही शिस्त, सक्ती आमच्या विद्यार्थ्यांंसाठी, पालकांसाठी एक चांगली सवय बनली आहे.
पिझ्झा, बर्गर, हॉट डॉग, वेफर्स, नुडल्स, केक यासारख्या फास्ट फूडची ओळख आपल्या मुलांना भलेही प्रसारमाध्यमातून झाली, असं आपण समजू; पण ते मुलांना घेऊन देणारे तर आपणच होतो ना! फास्ट फूड हे लहान वयात मुलांना लागलेलं नव्हे लावलेलं व्यसन असतं. आणि कोणतंही व्यसन मग ते सोडवायचं म्हटलं तर नियम, शिस्त ही येणारच. मुलांचं पोषण हा असा तात्पुरतं पोट भरणार्‍या बाजारू पदार्थांंनी कधीच होणार नाही. आईनं घाईनं का होईना पण काळजीपोटी बनवलेल्या पोळी-भाजीतच मुलांच्या आरोग्याचं रहस्य दडलेलं आहे. पोषक आहाराबाबतचा आमच्या शाळेचा अट्टाहास हीच जाणीव पालक आणि विद्यार्थ्यांंमध्ये विकसित करत आहे.

- रश्मी पंडित
मुख्याध्यापिका- अक्षर नंदन, पुणे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा