सोमवार, १३ फेब्रुवारी, २०१२

विज्ञान रंजन स्पर्धा २०१२

विज्ञान रंजन स्पर्धा २०१२ PDF Print E-mail
मराठी विज्ञान परिषद - मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग
विज्ञान रंजन स्पर्धा २०१२- नियमावली * ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. * प्रवेशमूल्य नाही. * खालील प्रश्नांची उत्तरे स्वत:च्या मनाने, कोणालाही विचारून, पुस्तकात पाहून, प्रत्यक्ष प्रयोग करून मिळविता येतील. * जास्तीत जास्त प्रश्नांची उत्तरे स्वत:च्या हस्ताक्षरात फुलस्केप कागदावर लिहून २० फेब्रुवारी २०१२ पर्यंत पुढील पत्त्यावर पाठवावीत- मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग. टिळक स्मारक मंदिर, टिळक रस्ता, पुणे ४१११०३०. * उत्तम प्रयत्नांना आकर्षक बक्षिसे. * २८ फेब्रुवारी या राष्ट्रीय विज्ञान दिनी विजेत्यांची नावे महाराष्ट्र साहित्य परिषद, टिळक रस्ता, पुणे ३० येथील संध्याकाळच्या कार्यक्रमात जाहीर केली जातील
++: शिक्षण आणि वय लक्षात घेऊन स्पर्धकांना पुढील प्रमाणे पुढावा गुण देण्यात येतील.
शिक्षण: पाचवीपर्यंत(१०), सातवीपर्यंत(९), दहावीपर्यंत(७), बारावीपर्यंत(५), पदवी(३) शास्त्रशाखा(०).
वय वर्षे: १३ पर्यंत(६), १४ ते १६(४), १७ ते २०(२), ४१ ते ६०(२), ६१ ते ८०(४), ८१ हून जास्त (६)
* आपल्या उत्तरपत्रिकेसोबत स्वतंत्र कागदावर पुढील माहिती लिहून पाठवावी-
१. संपूर्ण नाव, २. पत्ता, ३. दूरध्वनी, ४. ई-मेल, ५. जन्मतारीख, ६. शिक्षण, ७. व्यवसाय, ८. पुढावा गुण.
* परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. * अधिक माहितीसाठी वरील पत्त्यावर संपर्क करावा -
संजय भामरे (९९२२५५२०४६), विनय र. र., (९४२२०४८९६७), किंवा ई-मेल mavipa.pune@gmail.com ,.


प्रश्नावली

प्र. १ निरीक्षण करून उत्तरे लिहा . (गुण १० )
1. खेळातले कोणकोणते पत्ते उलट-सुलट वेगवेगळे दिसतात?
2. दहापेक्षा अधिक पाकळ्या असणारी फुले कोणती?
3. डावा दंड डाव्या कानावर ठेवून डाव्या पंजाने स्वत:चा उजवा कान पकडता येणे कोणत्या वयानंतर जमते?
4. पतंगाची उंची कन्नीच्या लांबीच्या किती पट असावी लागते?
5. तुमच्या घरातील गॅस सिलेंडरची उत्पादनाची तारीख कोणती? (ती कशी शोधली?)
6. नायलॉनचा धागा आणि लोकरीचा धागा बहिर्गोल भिंगातून बघितल्यावर कसे दिसतात त्याचे चित्र काढा.
7. गांडुळाच्या अंगावरील मोठे वळे त्याच्या तोंडापासून कितवे असते?
8. उकळत्या पाण्यात चहापत्ती घातल्यास उकळीत कोणता फरक पडतो?
9. वातकुक्कुटाची चोच कोणत्या दिशेला असते?
10. जीभ आणि भीज यातील ज चे दोन उच्चार दाखविणारे आणखी दोन शब्द लिहा.

प्र. २ थोडक्यात उत्तरे लिहा. (गुण १० )
1. नैऋत्य मोसमी पावसापेक्षा ईशान्य मोसमी पाऊस जास्त पडणारे राज्य कोणते?
2. अग्निशमनासाठी वापरले जाणारे गुंडाळ-नळ कशापासून बनविलेले असतात?
3. पिठाच्या गिरणीसाठी किती दाबाची वीज लागते?
4. तळहाताला फुटणा-या घामात कोणते जंतुनाशक असते?
5. कृत्रिम उपग्रह पृथ्वीपासून किमान किती अंतरावर असावा लागतो?
6. फ्लेक्स बोर्डसाठी कोणते पॉलीमर वापरतात?
7. वनस्पतींना सिलिकॉनचा उपयोग काय?
8. घड्याळ्यात तास-मिनिट-सेकंद काट्यांमध्ये एक समान कोन असणा-या वेळा कोणत्या?
9. सध्या शनि कोणत्या नक्षत्रात दिसतो त्या नक्षत्राचे पुढच्या मागच्या नक्षत्रासह चित्र काढा.
10. रुबिकच्या ठोकळ्यावर किती रंगांचे किती चौरस असतात?

प्र. ३ चूक की बरोबर ते लिहा (चुकीचे असेल ते दुरुस्त करून लिहा) (गुण १० )
1. बांबूला त्याच्या आयुष्यात एकदाच फुले येतात.
2. कावळ्याला एकच डोळा असतो.
3. पृथ्वीवर इतर सर्व ग्रहांवरून येऊन उल्का पडतात.
4. एखाद्या दाट वस्तीत जितकी अधिक वातानुकूलन यंत्रे असतील तितकी तेथील हवा गरम होत जाते.
5. हवा बाहेर फेकणा-या पंख्यांची पाती लांब असतात.
6. विहिरीतून उपसून काढलेले पाणी हे एक खनिज आहे.
7. साळींदर नेम धरून आपले काटे फेकून मारते.
8. लहान मुलांना टप्पू मारल्याने त्यांना मोठेपणी मेंदुघाताचा विकार होऊ शकतो.
9. आपल्या शरीरातील लाल पेशी हा एक स्वतंत्र जीव आहे.
10. काटकोन त्रिकोणातल्या कोणत्याही दोन कोनांची बेरीज तिस-यापेक्षा जास्त असते.

प्र. ४ शास्त्रीय कारणे द्या (गुण २०)
1. फरसबंद खोलीसाठी फुलझाडू, सारवलेल्या अंगणासाठी केरसुणी तर रस्ता झाडण्यासाठी खराटा वापरतात.
2. हेडफोन कानाला लावून गाणी ऐकणा-यांना बहिरेपण लवकर येते.
3. एकाच जागी बराच वेळ उभे राहणा-या व्यक्तींनी बुटात बोटाच्या हालचाली केल्या पाहिजेत.
4. उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यात लोक रंगीत कपडे वापरणे पसंद करतात.
5. हमरस्त्याच्या कडेला पिवळे-काळे पट्टे रंगविलेले असतात.
6. फोनवर हळू आवाजात बोलणे चांगले.
7. सतत एकच एक पीक काढल्यावर जमिनी नापीक होतात.
8. घनदाट अरण्यातील झाडे उंच वाढतात.
9. घराच्या आतल्या भिंती गुळगुळीत करतात तर बाहेरच्या खडबडीत करतात.
10. स्वच्छतेचा अतिरेक करणा-यांना पचनाचे रोग होण्याची शक्यता जास्त असते.

प्र. ५ सविस्तर उत्तरे लिहा. (गुण ३0)
1. टोक, शेंडा, शिखर, कड, बाजू, धार या शब्दांचे नेमके अर्थ काय?
2. आपल्या पिण्याच्या पाण्यात क्षार आहेत का हे कसे तपासता येईल?
3. आगगाडीचा वेग आणि समुद्रातील जहाजाचा वेग मोजणे यात फरक काय?
4. माणूस वगळता प्राण्यांना गरजेच्या न वाटणा-या पाच महत्वाच्या गोष्टी कोणत्या?
5. गाईगुरांना चारणीला नेणे किंवा जागेवरच चार देणे यातील फायदे तोटे यांची तुलना करा.
6. आत्ये-मामे भावंडांमध्ये विवाह होऊन त्यांना अपत्य झाल्यास त्या अपत्यात त्याच्या सामायिक पणजीची किती टक्के जनुके असतील? आत्याच्या सासूच्या जनुकातील तसेच मामाच्या सास-याच्या जनुकातील किती टक्के जनुके अपत्यात असतील?
7. तुमच्या आसमंतात कोणकोणत्या प्रकारच्या लहरी आहेत याची यादी करा.
8. प्रत्येकी एक उदाहरण द्या - एकट्याने, जोडीने, कुटुंबाने, कळपाने, समूहाने राहणारे प्राणी.
9. बसचे इंजिन पुढे असणे सोयीस्कर की मागे? स्पष्ट करा.
10. टिव्हीवरून प्रक्षेपित होणारा कार्यक्रम कोणकोणत्या माध्यमांतून कोणकोणत्या स्वरुपात प्रवास करतो?

प्र. ६ करून पहा, निरीक्षणे नोंदवा, निष्कर्ष लिहा . (गुण १५)
1. प्लास्टिकच्या पिशवीची जाडी कशी मोजाल? पिशवीची जाडी आणि पिशवीचा वापर यात काही संबंध आहे का? उदा. - दुधाची पिशवी, ओल्या कच-याची पिशवी इ.
2. २०१२ साली संकष्टी चतुर्थीचे चंद्रोदय आणि सूर्यास्त यांच्या वेळांचे आलेख काढा. त्यावरून ऋतुमानानुसार किंवा सूर्य- पृथ्वी मधील अंतर यानुसार पडणारा फरक कोणता?
३. २ लिटर क्षमतेचे एक पातेले घ्या. त्यात १ लिटर पाणी घाला. एक लाकडी पेन्सील घेऊन पातेल्याच्या काठावर दर ५ सेकंदाला एक असे टोले द्या. त्यामुळे पाण्याच्या पृष्ठभागावर कशा प्रकारचे तरंग उठतात? दर चार / तीन / दोन / एक सेकंदाला टोले दिल्यावर पृष्ठभागावरचे तरंग कशा प्रकारे बदलतात?

प्र. ७ वैज्ञानिक वार्तापत्र लिहा (गुण २०)
पाच मित्रांची पुनर्भेट - रान्चो, पिया, राजू, फरहान आणि चतुर हे पाच मित्र १ जानेवारी २००७ ला पृथ्वीवरून एकाच यानातून पृथ्वीच्या बाहेर निघाले. ते अनुक्रमे बुध, शुक्र, मंगळ, गुरु आणि शनि येथे पोचले आणि वस्ती करून राहिले. १ जानेवारी २०१२ ला ते पुन्हा पृथ्वीवर एकाच ठिकाणी परतले असे कल्पून त्यांची काल्पनिक मुलाखत घेऊन वैज्ञानिक वार्तापत्र तयार करा. ते तेथे पोचले कधी? तेथील किती दिवस, किती वर्षे ते तेथे राहिले? त्यांच्यावर तेथील गुरुत्वाकर्षण, प्रकाशमान, हवामान यांचा कोणता परिणाम झाला? इ. प्रश्नांची उत्तरे मिळवा.

प्रश्नांची उत्तरे स्वत:च्या हस्ताक्षरात फुलस्केप कागदावर लिहून २० फेब्रुवारी २०१२ पर्यंत पुढील पत्त्यावर पाठवावीत-
मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग. टिळक स्मारक मंदिर, टिळक रस्ता, पुणे ४१११०३०.

मंगळवार, ३१ जानेवारी, २०१२

‘परीक्षा नको’ : विद्यार्थ्यांसाठी वरदान - डॉ. मनीष देशपांडे

सौजन्य - लोकसत्ता

विद्यार्थ्यांचं मूल्यमापन हे विद्यार्थी, पालक, शिक्षक व समाज या सर्व घटकांना योग्य झालं असं वाटलं पाहिजे. त्यासाठीची सर्वसमावेशक रचना व नियंत्रण असणारी व्यवस्था निर्माण करणं हे एक आव्हान होतं. हे आव्हान आपल्या शिक्षणतज्ज्ञांनी स्वीकारून मूल्यमापनाची अभिनव पद्धती शोधून काढली. नव्हे जन्माला घातली. ‘सातत्यपूर्ण र्सवकष मूल्यमापन’ ही पद्धती आता सर्वच शाळांमध्ये रुजू लागली आहे..शि क्षण म्हणजे आत्म्याचा विकास, असं महात्मा गांधींनी म्हटलं आहे. आत्मोन्नती किंवा स्वविकास सहज शिक्षणातून होत असतो. हे ‘सहज’ शिक्षण सध्याच्या काळात दुर्मिळ होत चाललं आहे. शाळा-महाविद्यालये ही फक्त परीक्षा केंद्रे होत आहेत आणि विद्यापीठे किंवा परीक्षा मंडळे ही ‘सर्टिफिकेट’ देणाऱ्या संस्था. हे प्रमाणपत्र विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आलेख सांगत नाहीत किंवा त्यांच्या विकसित झालेल्या क्षमता स्पष्ट करीत नाहीत. तर केवळ कागदावर उतरविलेल्या तोकडय़ा ज्ञानाची किंमत सांगतात. त्या देखील वादातीत नाहीत. मग परीक्षा हव्यात कशाला?
बालकाची प्रत्येक हालचाल टिपून त्याच्या विकासासाठी किंवा योग्य दिशेने त्याची पावले पडावीत. तसेच त्याचं भावविश्व टप्प्याटप्प्यानं विशाल व्हावं. त्याच्या शारीरिक हालचाली किंवा कृती या शारीरिक विकासासाठी पूरक व्हाव्यात. त्याची दृष्टी नेमकेपणाने सौंदर्य टिपणारी व्हावी. त्याचा विचार निरीक्षणातून व्यापक व्हावा. त्याची बुद्धी असामान्यतेकडे झुकणारी व्हावी आणि त्याचं मन पाण्यासारखं नितळ व्हावं. त्यासाठी शिक्षणातून काही धडपड झाली तर बालक निश्चितपणे सर्वागीण विकासाच्या दिशेनं झेपावतो आहे, असं म्हणता येईल.
कुमारावस्थेत शारीरिक, मानसिक, बौद्धिक क्षमतांमध्ये कमालीचे बदल होत असताना विद्यार्थ्यांला मित्रत्वाने सोबत राहणाऱ्या मित्रमैत्रिणींबरोबरच शिक्षक-पालकांचा आधार वाटत असतो. परंतु, परिस्थिती अगदी उलट आहे. समवयस्क मित्रमैत्रिणींमध्येच समायोजन क्षमतांचा अभाव आहे. शिक्षक आपल्या अभ्यासक्रमाशिवाय इतर बाबींवर विद्यार्थ्यांशी चर्चा करायलाही तयार नाहीत. आपल्याला काय करायचंय, या भावनेनं विद्यार्थ्यांना टाळण्याचा प्रयत्नही बऱ्याच अंशी होतो. अशावेळी एखादा शिक्षक किंवा पालक मित्रत्वाच्या नात्यानं बालकाच्या भावना समजून घेऊन त्याच्या मनातील काहूर थोपवून त्याला वेगळ्या दिशेनं जाण्याची प्रेरणा देत असेल, त्याच्या क्षमता ओळखून त्यानुसार योग्य मार्गदर्शक म्हणून सोबत राहत असेल तर तो शिक्षक किंवा पालक एक राष्ट्रीय कार्य करतो आहे असे म्हणावे लागेल. पण हा योग तसा दुर्मिळच.
शिक्षणाचा सध्याचा बाजार, योग्य मार्गदर्शकाचा अभाव, विद्यार्थ्यांना त्यांच्या भावभावना समजून घेऊन मित्रत्वाच्या नात्यानं त्यांचं ‘लर्निग’ सहज करणाऱ्या शिक्षकांचा अभाव या बाबी शिक्षणाबद्दल विद्यार्थ्यांच्या मनात उदासीनता निर्माण करणाऱ्या आहेत.
या सर्वाचा विचार करूनच भारत सरकारनं शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ लागू केला व शिक्षणाला अनौपचारिक शिक्षणाची झालर देण्याचा कृतीयुक्त प्रयत्न केला. विद्यार्थ्यांच्या मनावरील ताणतणाव तसेच दडपण कमी करूनच भयमुक्त शिक्षणाचं दालन या अधिनियमानं खुलं केलं, असं म्हणता येईल. सामान्यत: कोणतीही परीक्षा म्हटलं की, विद्यार्थी पहिल्यांदा त्याचं दडपण, भीती आणि ताणतणाव यामध्ये राहतो. परीक्षेपूर्वी अभ्यासाचं दडपण तर परीक्षेनंतर किती गुण मिळतील याचं दडपण. या दडपणांमधून बाहेर येण्यासाठी ‘परीक्षा नको’ हा विचार पटायला लागतो. कधी-कधी हा ताण इतका वाढतो की एखादा विद्यार्थी अनावश्यक पाऊल उचलतो किंवा आपलं जीवनच संपवतो. मग आपण त्याची केवळ चिकित्सा करतो. त्यावरच्या प्रभावी उपायांवर आपण कृती तर सोडाच पण साधं भाष्य करणंही टाळतो.
विद्यार्थ्यांचं मूल्यमापन हे विद्यार्थी, पालक, शिक्षक व समाज या सर्व घटकांना योग्य झालं असं वाटलं पाहिजे. त्यासाठीची सर्वसमावेशक रचना व नियंत्रण असणारी व्यवस्था निर्माण करणं हे एक आव्हान होतं. हे आव्हान आपल्या शिक्षणतज्ज्ञांनी स्वीकारून मूल्यमापनाची अभिनव पद्धती शोधून काढली. नव्हे जन्माला घातली. सातत्यपूर्ण र्सवकष मूल्यमापन ही पद्धती आता सर्वच शाळांमध्ये रुजू लागली आहे.
परीक्षा नाही म्हणजे नेमके काय, हे आपण समजून घेतलं पाहिजे. तरच मूल्यमापनाचे नवे आयाम सर्वाना लक्षात येतील.
बालकानं या सातत्यपूर्ण र्सवकष मूल्यमापनाचा घटक होणं म्हणजे शाळेत दाखल होणं आवश्यक आहे. अनेक शाळाबाह्य मुले या शिक्षणाच्या प्रवाहातच नाहीत. जे आहेत ते टिकले पाहिजेत आणि जे टिकले ते सुसंस्कारित व विवेकी व्हावेत अशी सामान्य अपेक्षा आहे. हे करीत असताना पालकांनी आपल्या पाल्याला अवास्तव अपेक्षा ठेवून शाळेत दाखल न करता सहज ज्या गोष्टी आपल्या पाल्याला जमतात त्याचा आग्रह धरला पाहिजे.

इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शाळेत शिकत असताना प्रत्येक बालकांच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक, भावनिक तसेच सामाजिक क्षमतांच्या विकासांचे वयोगटानुसार टप्पे निश्चित करून त्या त्या टप्प्यानुसार निरीक्षण व नोंदी करून, ‘ओपन बुक’ चाचणी घेऊन किंवा विद्यार्थ्यांना गटकार्य देऊन, वैयक्तिक अभिव्यक्तीची संधी देऊन, ‘चुका व शिका’ पद्धतीने त्यांचे अनुभवविश्व अधिक व्यापक करणं अशी सातत्यपूर्ण र्सवकष मूल्यमापन पद्धती ही विद्यार्थ्यांच्या व्यक्तिगत विकासासाठी पूरक, पोषक व परिणामकारक ठरणारी आहे.

भयमुक्त व कॉपीमुक्त परीक्षा हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून शालेय परीक्षेमध्ये अधिक पारदर्शकता आणणं व त्यातून विद्यार्थ्यांचा विश्वास व आत्मविश्वास वाढविणं ही काळाची गरज आहे. प्रचलित परीक्षा पद्धतीतील दोष दूर करून केवळ पाठय़पुस्तकातील ज्ञानाचं मूल्यमापन करण्यापेक्षा समग्र मूल्यमापन हे समर्थ विद्यार्थी घडविण्याच्या दृष्टीने उचललेलं धाडसी पाऊल आहे.
ओपन बुक चाचणी ही तर स्पर्धा परीक्षेच्या धर्तीवर वस्तुनिष्ठ स्वरूपाची व गुणांऐवजी ‘श्रेणी’ देणारी मूल्यमापन पद्धती ही आधुनिक व विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला, निरीक्षणाला व नियोजनाला वाव देणारी अशी पद्धती आहे.

विद्यार्थ्यांनी शिक्षणक्रम पूर्ण करताना केलेल्या वेगवेगळ्या बाबींच्या नोंदी व त्यातून त्यांचे समोर आलेले व्यक्तिमत्त्व उलगडणारे पैलू यातून त्यांचा ‘स्वोट अॅनालिसिस’ यात केला जातो. विद्यार्थ्यांना त्यांच्यातील प्रभावी गुण, कमतरता, त्यांच्या व्यक्तित्वाला साजेशा संधी आणि त्या संधी प्राप्त करण्यासाठी स्वीकारायची आव्हाने यांचं विश्लेषण करणारी मूल्यमापन पद्धती एक वरदान ठरणार हे नक्की.
‘डोळा’ या एकमेव ज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून व्यक्ती जवळपास ८३ टक्के ज्ञान मिळविते. याचा आधार घेऊन विद्यार्थ्यांची निरीक्षण क्षमता व त्यातून नवनवीन संकल्पनांची त्यांच्या ज्ञानात पडणारी भर वेळोवेळी शिक्षकांनी टिपणं व त्या ज्ञानाच्या आधारावर विद्यार्थ्यांनी केलेली स्वत:ची ज्ञानरचना यात अपेक्षित आहे. ही ज्ञानरचनावाद अध्ययनाला गती देणारी पद्धती विद्यार्थ्यांच्या संकल्पना व विचार शक्तीला प्रगल्भ करणारी अशी आहे.

शिक्षकांनी विद्यार्थ्यांचं सहा ते १४ वयोगटात त्यांच्या विद्यार्थ्यांचे टप्प्याटप्प्याने झालेल्या सर्वसमावेशक बदलांचे निरीक्षण करून एक-एक विद्यार्थी कोणकोणत्या क्षमतांनी परिपूर्ण आहे व कोणत्या क्षमता त्याच्यामध्ये विकसित करण्यास वाव आहे याचा समग्र लेखाजोखा श्रेणीच्या स्वरूपात वयाच्या चौदाव्या वर्षी समोर आणायचा आहे. या मूल्यमापनामुळे विद्यार्थ्यांचं माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण कोणत्या पद्धतीनं होणार आहे किंवा कोणत्या विद्याशाखेकडे त्याचा कल आहे हे नि:संशयपणे सांगता येईल.
त्यामुळे केवळ ज्ञान व आकलनावर आधारित व गुणांना महत्त्व देणाऱ्या मूल्यमापनापेक्षा ज्ञानाचे उपयोजन व कौशल्यांचा आविष्कार घडवून आणणारी मूल्यमापन पद्धती ही ‘परीक्षा नको’ ही संकल्पना अधिक नेमकेपणानं स्पष्ट करणारी अशी आहे. उदासीनतेच्या, नैराश्यतेच्या गर्तेतून बाहेर काढून विचार आणि कृतीच्या दृष्टीने अनुभवसंपन्न व सकारात्मक दिशेनं वाटचाल करणारा विद्यार्थी घडवायचा असेल तर आधुनिक मूल्यमापन पद्धतीचं मनातून स्वागत करून ही पद्धती प्रभावीपणे रूजविण्यासाठी शाळांना व शिक्षकांना विद्यार्थी, पालक व समाजाने आग्रह धरला पाहिजे. अशी सांघिक कृती विद्यार्थ्यांना यशाच्या शिखरावर नेऊ शकेल.

फॅशन म्हणून पालकांनी मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालू नये - डॉ. अनिल काकोडकर यांचे स्पष्ट मत

सौजन्य -  लोकसत्ता

ज्ञानभाषा म्हणून इंग्रजी भाषेचे महत्त्व कितीही असले तरी प्राथमिक शिक्षण हे मुलांच्या मातृभाषेतूनच झाले पाहिजे. फॅशन म्हणून पालकांनी मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालू नये. कारण मातृभाषा हे हेच शिक्षणाचे स्वाभाविक माध्यम असून त्याच भाषेतून मुलांचा सर्वागीण विकास होऊ शकतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी केले.

मराठी अभ्यास केंद्राच्या चौथ्या विद्यार्थी-शिक्षक मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. ज्ञाननिर्मितीसाठी इंग्रजी भाषेचा वापर होत असला तरी सर्वसामान्यांपर्यंत विज्ञान व तंत्रज्ञान लोकभाषेतूनच प्रभावीपणे पोचविता येईल, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

मराठी भाषा व संस्कृतीसाठी काम करू इच्छिणाऱ्या आजी-माजी विद्यार्थी शिक्षकांच्या या मेळाव्याला मुंबई, ठाणे, कर्जत, पालघर परिसरातील विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. या मेळाव्यात मराठी भाषेच्या संवर्धनासाठी मौलिक योगदान देणाऱ्या डॉ. दत्ता पवार आणि मिलिंद चिंदरकर यांचा डॉ. काकोडकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

मराठी संशोधन मंडळाचे अध्यक्ष डॉ. दत्ता पवार यांनी विद्यापिठीय अभ्यासक्रमात मराठी विषयाचे स्थान अबाधित राहावे म्हणून उभ्या राहिलेल्या भूतकाळातील आंदोलनांच्या यशापयशाचा आढावा यावेळी घेतला. तर महात्मा गांधी विद्या मंदिर या मराठी माध्यमाच्या शाळेचे संचालक मिलिंद चिंदरकर
यांनी ‘गुरुकुल’ या मराठी माध्यमातील शाळेच्या अभिनव प्रयोगाची माहिती देत आनंददायी, अनुभवाधिष्ठित आणि मराठीतील शिक्षणातून मुलांचा सर्वागीण विकास होतो हे पालकांनी ओळखले पाहिजे हे आग्रहपूर्वक मांडले. तसेच ‘घोका आणि ओका’ यामधून बाहेर पडून विद्यार्थ्यांनी खऱ्या ज्ञानाचा शोध घ्यावा, असे आवाहन विद्यार्थ्यांना केले.