बुधवार, १ सप्टेंबर, २०१०

जागृती मेळावा

दि २६.८.२०१० या दिवशी अक्षरनन्दन शाळेमध्ये विद्याताई, गौरीताई, सुहासताई तसेच इतर शिक्षक आणि सर्व वर्गांचे पालक प्रतिनिधी यांची ४ सप्टेंबर च्या 'शिक्षण हक्क समन्वय समिती'च्या नियोजित कार्यक्रमाबाबत बैठक झाली. या बैठकीत ठरल्याप्रमाणे खालील पत्र आम्ही शाळेच्या सर्व पालकांना पाठवत आहोत.
सप्रेम नमस्कार.
२००९ च्या शिक्षण अधिकार कायद्याच्या निमित्ताने अनेक महत्वाचे मुद्दे समोर आले आहेत. गेली काही वर्षे महाराष्ट्रात मराठी शाळांसाठी अघोषित बंदी आहे. म्हणजे नव्या इंग्रजी शाळा काढायला प्रोत्साहन पण मराठी शाळेला परवानगी नाही असे हे धोरण आहे.
याचे दूरगामी परिणाम आपण सारे जाणतोच. त्यात नवा शिक्षण अधिकार कायदा आला आणि त्याचा आधार घेऊन महाराष्ट्र सरकारने मूळ उद्देशाला छेद देणारे अनेक आदेश काढायला सुरुवात केली आहे. याचा परिणाम म्हणून आत्ताच अनेक चालू शाळा बंद पडल्या आहेत. ह्या घडामोडी आपण शांतपणे बघत बसलो तर पुढे अनर्थ होईल.
आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्यासारख्या प्रयोगशील शाळांवरही अनेक बंधने येऊ पाहताहेत. शिक्षण पद्धतीतले जे दोष दूर करण्याचा आपली शाळा प्रयत्न करत आहे तेच दोष आपल्याला पुन्हा स्वीकारावे लागतील अशी चिन्हे आहेत. जुनाट पद्धतीचे प्रचलित शिक्षक प्रशिक्षण घेणे आता बंधनकारक बनले आहे. असे अनेक प्रश्न आता आपल्या दारापर्यंत आले आहेत.
बदललेली परिस्थिती समजावून घेणे आणि आपणही या प्रश्नांवर भूमिका घेणे आता आपल्याला आवश्यक ठरणार आहे. आपल्या शाळेने जे मूल्य रुजवण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे त्यावरचा विश्वास आपण या शाळेचे पालक या नात्याने जोरकसपणे प्रकट करणेही आवश्यक आहे.
शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ञ व्यक्ती आणि अनेक मराठी शाळांनी एकत्र येऊन शिक्षण हक्क समन्वय समिती स्थापन केली आहे. या गटातर्फे दि. ४ सप्टेंबर २०१० या दिवशी जागृती मेळावा आयोजित केला आहे. दु. ४ ते ६ या वेळेत संभाजी पुलाच्या दुतर्फा मुले, पालक व नागरिक जमा होतील आणि या प्रश्नांवरची आपली जागरूकता समाजासमोर मांडतील. आपल्या शाळेने यामध्ये सक्रीय सहभाग घेण्याचे ठरवले आहे. प्रत्येक वर्गाचे प्रतिनिधी, पालक आणि मुले यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे असे आवाहन आम्ही आपल्याला करत आहोत.
सर्व सहभागी लोकांतर्फे एक पत्र शासनाला देण्याचे ठरले आहे. त्यावर आवर्जून सही करावी. अक्षरनंदनच्या पालकांनी शक्यतो दु.४ वा. सेनापती बापट यांच्या पुतळ्याजवळ जमावे. (अलका टाकीजच्या चौकात)
सोबत जोडलेली पत्रके जरूर पहावीत.
( अधिक माहितीसाठी आपल्या शाळेच्या संस्थापक सदस्य सुहास कोल्हेकर - 9422986771 यांच्याशी जरूर संपर्क साधावा. )

शुक्रवार, ३० जुलै, २०१०

नविन मुख्याध्यापक - रश्मी पंडीत

कालच्या पालक-शिक्षक भेटीत मुख्याध्यापक संध्या हिंगणे यांचा पदनिवृत्ती चा ठ्ररावा मंजूर झाला. संध्याताई २००० पासून शाळेच काम पहात आहेत. पर्यवेक्षक ते मुख्याध्यापक असा त्यांचा प्रवास आहे. गेली पाच वर्ष मुख्याध्यापकपदाची जबाबदारी सांभाळल्यानंतर, त्या आता 'प्रशासकीय संयोजक' ही जबाबदारी सांभाळ्तील.

आताच्या उपमुख्याध्यापक रश्मी पंडीत (एम फिल, बि एड) या आपल्या शाळेच्या नविन मुख्याध्यापक झाल्या आहेत.

अरुंधती तुळपुळे या शैक्षणिक-संयोजक पदाची जबाबदारी स्विकारतील.